मुंबई : वृत्तसंस्था
बिहार निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेसच्या पराभवावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या रणनीती, सल्लागारांचे अंदाज आणि जागावाटपातील चुका यावर स्पष्टपणे टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर थेट बोट ठेवले.
चव्हाण म्हणाले की, “मी बिहारला गेलो नाही, त्यामुळे संपूर्ण राज्यावर भाष्य करणे उचित नाही. पण काँग्रेसच्या सल्लागारांनी दिलेले अंदाज वास्तवापासून दूर होते. आपल्याकडे १९ जागा होत्या, त्या २१-२२ झाल्या असत्या, किंवा १७-१८ असल्या तरी मान्य होते. पण निवडक ३० जागा लढून ४० जागा राजदला दिल्या असत्या तर परिणाम वेगळे दिसले असते.”
चव्हाण यांनी सांगितले की जागावाटपात उदारमतवादी भूमिका घेतली नाही, ही मोठी चूक ठरली. योग्य संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेसकडून कमी पडल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, “विचारांची लढाई एक-दोन दिवसांत संपत नाही. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी किती वेळ घेतला हे आपण जाणतो. आजही त्याच प्रकारचा संयम आणि आत्मपरीक्षण गरजेचे आहे.”
चव्हाण पुढे म्हणाले, “आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. सल्लागारांनी मतांचे आरक्षण करून जे आकडे दिले ते योग्य नव्हते. निवडक जागा लढून उर्वरित जागा राजदला दिल्या असत्या तर परिणामावर प्रभाव पडू शकला असता.” बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच अशाप्रकारे प्रश्न उपस्थित केल्याने या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.