मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून देऊन राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी हे आरक्षण फेटाळून लावत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंबंधी सगेसोयरे अधिसूचनेच्या तत्काल अंमलबजावणीचाही आग्रह् धरला आहे. त्यांच्या निर्देशांनुसार या प्रकरणी राज्य भरात 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर या रास्ता रोकोचे धरणे आंदोलनात रुपांतर करण्यात आले.
कन्नड – वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील नवरदेव आपल्या वऱ्हाडी मंडळीसह कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथे लग्नासाठी चालले होते. मात्र औराळा फाटा येथे रास्तारोको आंदोलन सुरू असल्याने नवरदेवाची गाडी थांबली. या ठिकाणी नवरदेवासह ववऱ्हाडी मंडळी देखील या रास्तारोको आंदोलनात अर्धा तास सहभागी झाले. आरक्षण नाही, आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही आणि नोकरी नसल्याने छोकरी मिळत नाही. त्यामुळे मला लग्नासाठी जाऊ द्या, अशी विनंती नवरदेवाने यावेळी आंदोलन कर्त्यांना केली. त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी फक्त नवरदेवाची गाडी सोडली. वऱ्हाडी मंडळी आंदोलन संपल्यानंतर विवाहस्थळाकडे रवाना झाले.