छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येणार असून ११ ते १५ डिसेंबर असा दौरा निश्चित झाला आहे. केंद्राच्या फलोत्पादन विभागाच्या सहसचिव प्रिया राजन यांच्या नेतृत्वाखाली ९ जणांचे पथक ११ डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १३ आणि १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची प्रत्यक्ष पाहणी दोन टीम करणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून माहितीचे संकलन आणि इतर बाबींची तयारी सुरू झाली आहे.
केंद्रीय पाहणी पथकामध्ये सहसचिव प्रिया राजन यांच्यासह विविध विभागांच्या ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. पथक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहे. ११ डिसेंबर रोजी पुण्यात मुक्काम केल्यानंतर १२ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तालयात बैठक घेणार आहे. राज्याचे कृषी आयुक्त हे पथकासमोर दुष्काळाच्या परिमाणाच्या बाबतीत सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर पथकाच्या चार टीम तयार केल्या जाणार असून १३ आणि १४ डिसेंबर रोजी या चार टीम राज्यातील आठ जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत.
पहिली टीम छत्रपती संभाजीनगर आणि जालना, दुसरी टीम बीड आणि धाराशीव, तिसरी टीम पुणे आणि सोलापूर, तर चौथी टीम नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची पाहणी करणार आहे. या दौन दिवसांच्या दौऱ्यात सर्व टीम दुष्काळी भागांत प्रत्यक्ष जाऊन गावांची पाहणी करणार आहेत. ही पाहणी आटोपल्यानंतर १५ डिसेंबर रोजी पुन्हा पुणे येथील विभागीय आयुक्तालयात पथक राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.