मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मिरा-भाईंदर शहरात विविध नागरी समस्या ज्वलंत असताना पालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेत होणारे गैरव्यवहार तसेच कामचुकारपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ३० सप्टेंबर रोजी आ. प्रताप सरनाईक आयोजित सनातन राष्ट्रसंमेलनाच्या समारोपासाठी मिरा- भाईंदरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांच्या हस्ते पालिकेच्या अनेक विकासकामांचे तसेच उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांना शहरातील समस्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी (एसपी) ने काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यावर नवघर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ३० सप्टेंबर रोजी सकाळी भारतीय दंड संहितेतील कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावून त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली. मात्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी आदल्या दिवशीच भूमिगत झाल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाही.
मुख्यमंत्र्यांचा ताफा राष्ट्रसंमेलनाकडून मीरारोडच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाकडे निघाला असताना सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून पालिका व राज्य शासनाचा निषेध केला. यावेळी नवघर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यातील ८ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी (एसपी) चे जिल्हाध्यक्ष ऍड, विक्रम तारे-पाटील, कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुकी, जिल्हा उपाध्यक्ष नवाज गैबी, मुबी पटेल, सचिव जुनेद खान, पदाधिकारी भावेश राठोड, शविना सय्यद आदी उपस्थित होते.