अक्कलकोट : सध्या जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना अक्कलकोट शहराची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच समाधानकारक आहे. शहरात सध्या फक्त एक कोरोना रुग्ण आहे तर ग्रामीणमध्ये चार रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
एक महिन्यापासून तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. तरीही नगरपालिका प्रशासन, तालुक्याचे आरोग्य विभाग हे सातत्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. अक्कलकोट शहरात सध्या देखील रुग्ण नसताना पालिका प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे. यात मुख्याधिकारी सचिन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड हे सातत्याने या बाबतीत लक्ष ठेवून आहेत.
सध्याच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास केला तर अक्कलकोट शहर कोरोना मुक्त झाले असे म्हणण्यास हरकत नाही. कारण अक्कलकोट शहरांमध्ये सध्या एकच रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आज देखील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी दिली आहे.