मुंबई : वृत्तसंस्था
पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली असून, थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि. २५) निफाडमध्ये ८.७ तर नाशिकमध्ये १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या सप्ताहाच्या अखेरपर्यंत तापमानातील घसरण कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मागील सप्ताहामध्ये ढगाळ वातावरण कमी होऊन आकाश निरभ्र झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन किमान तापमानात वाढ झाली होती. वाऱ्यांचा वेगही ताशी ७ ते १२ किलोमीटर असल्याने दिवसभर वातावरणात झोंबणाऱ्या वाऱ्यामुळे कमालीचा गारठा जाणवत होता. शनिवार (दि. २३) पासून ढगाळ वातावरण निवळले असून, दिवसा उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, रात्री व पहाटे थंडी कायम असल्यामुळे किमान तापमानात घसरण झाली आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवणार असल्याची शक्यता आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा वाढत असल्याने नागरिकांकडून उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.
बाजारात देखील स्वेटर, मफरल, कानटोपी आदी कपड्यांची मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. तीन दिवसांपुर्वी १६ अंशांपर्यंत वाढलेले नाशिकचे किमान तापमान पुन्हा बारा अंशांपर्यंत घसरले आहे.