अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना बुधवारी ‘रंग जल्लोषाचा’ या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रमाने उपस्थित रसिकांनी एकच जल्लोष केला.थर्ड बेल एटरमेन्ट निर्मित या कार्यक्रमात चार कलाकारांनी अक्कलकोटमधील रसिकांची मने जिंकली. एका पेक्षा एक सरस हिंदी आणि मराठी गाण्यांचा बहारदार व्याख्यानमालेच्या सत्रात पहिल्यांदाच घेण्यात आला.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन स्वप्नील रास्ते यांचे होते. झी मराठी सारेगमप फेम अभिजित कोसंबी, अमित जोग,अबोली गिऱ्हे,अमिता घुगरी यांचा सहभाग होता. प्रारंभी श्री गणरायाला वंदन करून श्री गणेशाच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरी करतोय खोडी घागर थोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी या गवळणीने तर अबोली गिऱ्हे यांनी अक्षरशः प्रेक्षकांना डोक्यावर घेतले. अमिता घुगरे यांनी बाहो मे चले आओ, हमारे सनम क्या परदा हे सुंदर असे गीत सादर केले. परदेसीया ये सच है पिया, शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, डौल मोराच्या मानाचं र बैल मानचा जीवा शिवाची बैलजोडी, गालावर खळी डोक्यात धुंदी, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अश्विनी येना येना प्रिय जगू कसा तुझ्याविना मी राणी ग, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, त्याशिवाय बान नजरंतला घेऊनी सुंदरा चंद्रा अशी रसिकांना आवडत असलेली अनेक गाजलेली गीते सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात ढोलकीवर ओंकार इंगवले,ओकटोपॅडवर अनिकेत शहारे,कीबोर्डवर कुमार शहारे, ओंकार उजगारे आणि गिटारवर महेश भदे या कलाकारांनी साथ दिली.
प्रारंभी श्री गणेशाचे पूजन स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी,दिलीप सिद्धे,अभय खोबरे ,लाला राठोड,अशोक येणेगुरे, शिवराज स्वामी, अभिजीत लोके,चंद्रकांत दसले,बाळा शिंदे, दत्ता कटारे,लिंगराज कोटनुर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेराव घाटगे यांनी केले. तर आभार बापूजी निंबाळकर यांनी मानले. कार्यक्रमालाही रसिकांची मोठी गर्दी होती.