आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमधील वादावर आज पडदा पडण्याची शक्यता, दोन्ही आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं
मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमधील वादावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. दोन्ही सत्ताधारी आमदारांमध्ये पेटलेल्या वादाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या दोन आमदारामधील वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही आमदारांना आज चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. ‘बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी पैसे घेतल्याचा’ आरोप आमदार रवि राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडूंनीही त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.
आमदार रवि राणा यांनी आरोप केल्यानंतर ‘त्यांनी ते येत्या १ नोव्हेंबरपर्यंत सिद्ध करावेत, नाही तर वेगळी भूमिका घेऊ, याशिवाय या प्रकरणात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी’, असं वक्तव्य आमदार बच्चू कडूंनी केलं होतं. त्यानंतर रवि राणांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांना दुपारी १२ वाजता भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळं दोन्ही आमदार मुंबईत दाखल झाले असून त्यांनी याविषयी माध्यमांशी अधिक बोलणं टाळलं आहे. राणा आणि कडूंनी माध्यमांसमोर कोणतीही भूमिका मांडू नये, अशा सूचना सरकारमधील वरिष्ठांनी केल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत दोघांमधील वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.