मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहिण योजनेमुळे मोठे यश आल्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटच्या वेळी 2100 रुपये घोषित करु असे वक्तव्य केले नाही. 100 टक्के आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. पाच वर्षांसाठी जाहीर नामा तयार केलेला असतो. मंत्रिमंडळ जेव्हा तसे सूचित करेल तेव्हा आमच्या खात्याकडून तसा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली आहे.
अदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, लाडकी बहीन योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून योजनेवर टीका सुरू आहे. ही योजना लाडक्या बहीनींची सर्वात आवडती योजना ठरली. म्हणून कुठेतरी पहिल्यामहिन्यात पावणेदोन कोटी महिलांना लाभ मिळाला. तर निवडणुकीनंतर 2 कोटी 45 लाख महिलांना लाभ मिळाला. तर आता 2 कोटी 52 लाख महिलांना लाभ देणार आहोत. आम्ही निवडणुकीच्या आधी वेगळी निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेत नाही.
यावर बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले की, योजना सुरू करताना राज्य शासनाने 10 जीआर काढले. तेव्हा राजकीय हेतू ठेवत ही योजना सुरू केली हे सर्वांना माहिती आहे. योजना करताना विचारपूर्वक निर्णय झाला नाही. राजकीय हेतू ठेवत निर्णय घेण्यात आला. सतेज पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून ही योजना काढण्यात आला. बहीणींवर प्रेम म्हणून ही योजना काढण्यात आली नाही. मंत्री आज जे निकष सांगत आहेत ते पहिल्यापासून होते. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती. ज्यांना अपात्र करताय त्यांची फसवणूक केली जात आहे. सतेज पाटील म्हणाले की, तुम्ही जीआर काढत एक अशासकीय सदस्य अध्यक्ष केला आणि त्याला हे मान्य करण्यासाठी कायद्याने अधिकार दिले. खाली तुम्ही लिहले की ग्रामसेवक, अधिकाऱ्यांचे प्रमाणमत्र घ्या. तेव्हा जर योग्य होते तर आता अपात्र करू नका. तेव्हा लाडकी बहीण होती तर आता सावत्र बहीण आहे का? निकाल लागल्यावर बहिणी सावत्र वाटायला लागल्या का?