दिल्ली : जगभरातील बहुतांश भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. हे पुरावे कोरोना महामारी ओसरलेली नसल्याचे संकेत देत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन् यांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे आणि आफ्रिकेमध्ये मागील दोन आठवड्यांत मृत्यूचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे, असे स्वामिनाथन् यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
मागील २४ तासांत जगभरात पाच लाख नवे बाधित आढळले, तर ९,३०० बाधितांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, शिथिल करण्यात आलेले निर्बंध आणि लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगासह पाच कारणांमुळे डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार होत गोत असल्याचे त्यांनी सांगितले.
वेगाने संक्रमित होत असलेला डेल्टा व्हेरिएंट निश्चितपणे सर्वाधिक धोकादायक असून, वाढत्या संसर्गासाठी हाच व्हेरिएंट कारणीभूत आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाच्या मूळ विषाणूचा संसर्ग झाला असल्यास, ही व्यक्ती जवळपास तीन जणांना बाधित करते. मात्र, डेल्टा व्हेरिएंटने बाधित झालेली व्यक्ती जवळपास आठ जणांना संक्रमित करते, असा इशारा त्यांनी दिला.
महामारी किंवा निर्बंधांना कंटाळलेले लोक आता घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. त्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढत आहे. या व्यतिरिक्त बर्याच देशांनी प्रतिबंध हटवण्यास सुरुवात केली आहे आणि मुखाच्छादन घालण्यासारखे सुरक्षात्मक निर्बंधही हटवणे सुरू केले आहेत. त्याचा परिणामही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरणामुळे काही देशांत संसर्ग मंदावला काही देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने तिथे संसर्ग मंदावला आहे आणि बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाणही घटले आहे. मात्र, काही देशांमध्ये अद्याप प्राणवायूचा तुटवडा भासत आहे, रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत तसेच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे स्वामिनाथन् यांनी सांगितले.