मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) पद्धत आणली. पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. निवडणूक रोखे हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली गेली आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान शुक्रवारी संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला केला.
ते म्हणाले की, सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून कॉर्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून ही वसुली करण्यात आलेली आहे. एखाद्या कंपनीवर सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई होते. त्यानंतर – ती कंपनी बाँड खरेदी करते, हे उघड झाले आहे. काही – कंपन्यांना काम देऊन त्यातील हिस्सा या बाँडच्या माध्यमातून वसूल केला आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजपची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी चौकशी होईल ती अत्यंत कठोर कारवाई असेल, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेससह विरोधी पक्षांनाही या बाँडचे पैसे मिळाले आहेत का, या प्रश्नावर राहुल म्हणाले की, यातील सर्वात जास्त पैसा भाजपला मिळालेला आहे. १०-२० टक्के पैसा विरोधी पक्षांना मिळाला असेल, परंतु काँग्रेसकडे हायवे किंवा इतर कंत्राट देण्याचे अधिकार नाहीत. शिवाय सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांच्यावर विरोधी पक्षांचे नियंत्रण नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना मोठा निधी मिळू शकत नाही.