ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुन्हेगार बार्शी न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देवून निसटला !

सोलापूर : प्रतिनिधी

बार्शी न्यायालयात एका गुन्ह्यातील तारखेस हजर करण्यासाठी आणलेल्या आरोपीने लघुशंकेचा बहाणा करत पोलिसाच्या हातावर तुरी देऊन बार्शी न्यायालय परिसरातून पलायन केल्याचा प्रकार आज गुरुवार, दि. ७ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद ऊर्फ आनंद्या राजकुमार काळे (वय ३५, रा. कोरफळे, ता. बार्शी) असे पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्याचे नाव आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण (वय ५६, नेमणूक पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. स.पो. उपनिरीक्षक सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते व इनामदार, कारभारी, जाधव, घाडगे, भिल्ले व चालक पुजारी असे आज सकाळी एम.एच. १३ सी.एस. ४३५१ या वाहनासह सोलापूर येथून न्यायालयीन कोठडीतील चार पुरुष आरोपी व दोन महिला आरोपी घेऊन बार्शी न्यायालयात घेऊन आले होते. कारभारी, इनामदार व जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांना तीन पुरुष आरोपी व घाडगे, भिल्ले या दोघींना दोन महिला आरोपी यांच्यासह कोर्टास हजर करणेकामी पाठविले.

न्यायालयात आरोपी आनंद ऊर्फ आनंद्या राजकुमार काळे यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले व त्यानंतर त्याला सरकारी गाडीत घेऊन जात असताना त्याने लघवीला जायचे आहे असे सांगितल्याने त्याला बाथरूममध्ये घेऊन गेले. बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून पोलीस समोर पहारा देत असताना काळे हा खिडकीतून उडी टाकून पळू लागला. मोठ्याने आरडाओरड करून पकडण्यासाठी त्याच्या मागे बऱ्याच अंतरापर्यंत पाठलाग करूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला. काळेवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तब्बल पावणेतीन वर्षापासून काळे हा कोठडीत आहे. मोक्का प्रकरणात जामीन मिळावा म्हणूनही बार्शी न्यायालयात अर्ज दाखल असून त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काळे याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!