कार्तिकी यात्रेबाबत शासनस्तरावरच होणार निर्णय ; मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली माहिती
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१८ : राज्य सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नियम आणि अटीच्या शर्तीवर खुली केली आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची यात्रा आहे. परंतु यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच शासनस्तरावर एक बैठक होईल आणि त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
औसेकर महाराज हे काल श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत ह.भ.प. श्रीरंग महाराज औसेकर व त्यांच्या पत्नी श्रद्धा औसेकर व काही अनुयायी उपस्थित होते. पुढे बोलताना औसेकर महाराज म्हणाले, पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो वारकरी यानिमित्ताने पंढरीत येत असतात.आता कोरोनाचा उद्रेक थोडा कमी झाला आहे म्हणून सरकारने मंदिरे खुली केली आहेत. तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन अटी आणि शर्ती मंदिरांना लागू केले आहेत. त्याचे पालनही केले जात आहे. आता पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीचा मोठा प्रश्न आहे. प्रशासनस्तरावर याची चर्चाही सुरू झालेली आहे.
पंढरपूरच्या मंदिर समितीने देखील यासंदर्भात चर्चा सुरू केली असून मंदिर समितीची पहिल्या टप्प्यात बैठक होईल. या बैठकीमध्ये वारकऱ्यांचे प्रतिनिधी आणि संघटना यांचे मत जाणून घेण्यात येईल. त्यानंतर मंदिर समितीचा अभिप्राय शासनाकडे कळवला जाईल. त्यानंतर पुन्हा शासनस्तरावर एक लवकरच अंतिम बैठक होईल. त्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
सध्याच्या घडीला देखील मंदिर समिती आणि प्रशासन शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत भाविकांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे पण कार्तिकीच्या संदर्भात अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तो शासनाशी चर्चा केल्यानंतरच ठरेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने त्यांचा सचिव आत्माराम घाटगे आणि संगीतालंकार डॉ.हेरंबराज पाठक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष आबा महाराज कुरनूरकर, पिंटू पवार, शरणप्पा अचलेर श्रीशैल गवंडी, पप्पू गुरव, काशिनाथ गुरव, आबा येवते, सचिन पवार आदी उपस्थित होते.