कुरनूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवस लांबणीवर
बंधार्यांची किरकोळ दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
बोरी नदी काठच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी सोडण्यात येणारे कुरनूर धरणाचे पाणी चार दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती अद्याप बाकी असल्याने एक किंवा दोन फेब्रुवारीला पाणी सोडण्यात येईल,असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी सांगितले.
तालुक्याला वरदायनी ठरलेल्या कुरनूर धरणातून खालच्या भागात सोमवार दि.२७ रोजी पाणी सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकित झाले होते. पण खालच्या भागातील काही बंधारे दुरुस्ती व धरणावरील जनरेटर दुरुस्ती व अन्य काही तांत्रिक कारणामुळे पाणी १ किंवा २ फेब्रुवारी च्या नंतर सोडणार असल्याचे पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला होता.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जलसंधारण विभागाला दुरुस्तीचे आदेश दिले होते.या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांनी वेळेत सर्व बंधारे, स्वच्छ व दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर करत असून लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.