जालना : वृत्तसंस्था
आम्ही दिलेल्या व्याख्येसह राज्य सरकारने सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करावा, अधिवेशन संपेपर्यंत आम्ही वाट पाहू. काही सकारात्मक होत असेल तर आनंदच आहे, अन्यथा २१ फेब्रुवारी रोजी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचे मराठा योद्धा जरांगे- पाटील यांनी सांगितले. रयतेचे राजे शिवछत्रपतींची जयंती सर्वांनी आदर्श जयंती म्हणून साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी राज्यात सर्वत्र आदर्श अशी शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले.
सरकारकडून २० तारखेला विशेष अधिवेशन घेतले जात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे. याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. अधिवेशन संपेपर्यंत आपण वाट पाहू, अधिवेशनातील प्रत्येक घडामोडीकडे मराठ्यांनी लक्ष ठेवावे, आपल्या मागण्यांबाबत अधिवेशनात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. राज्यात आपले आंदोलन शांततेत सुरू आहे, त्याबद्दल आपले कौतुक आहेत; परंतु भविष्यातील आंदोलनेही शांततेतच असली पाहिजेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना आणि परत येताना कुठलाही त्रास होता कामा नये, असे ते म्हणाले.