ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रीन फील्ड हायवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला शासनाकडे सकारात्मक अहवाल

चपळगांव व मैंदर्गी येथे भुसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शासन व चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांमध्ये अत्यल्प मोबदल्यासंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून चाललेला संघर्ष थांबला पाहिजे. ही भावना लक्षात घेऊनच भुसंपादन विभाग ११ यांच्याकडुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य ती माहिती घेतली
आहे.अक्कलकोट,बार्शी,दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली.

अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव व मैंदर्गी येथे ग्रीनफिल्ड हायवेच्या मोबदल्यासंदर्भात अडचणींविषयी आयोजित बैठकीत उपजिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,न्यायालयात न्यायाची बाजु मांडण्याचे हक्क ठेवून
बाधित शेतीच्या मोबदला घेऊन शेतकऱ्यांनी शासनास मदत करावी.यावेळी नुतन तहसीलदार विनायक मगर,अप्पर
तहसीलदार श्रीकांत कांबळे,सरपंच वर्षा भंडारकवठे,सहायक पोलिस निरीक्षक निलेश बागव,विधी अधिकारी राजेश अंदाणे,स्वप्नील तोडकर,ग्रामसेवक सोमलिंग किणगी,मंडल अधिकारी राजकुमार कोळी,रमाकांत भासगी,तलाठी योगेश जारवाल यांच्यासह बाधित गावचे तलाठी व संबधित अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे अहवालाच्या रूपात सादर केल्याची बातमी कळाली.हे ऐकून खुप आनंद झाला,असे संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा चपळगाव ग्रामपंचायतच्यावतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकतनाळ यांनी केले तर आभार सिद्धाराम भंडारकवठे यांनी मानले.दरम्यान चपळगाव येथे बुधवारी भूसंपादन विभाग व बाधित शेतकरी अशी जी बैठक झाली.त्या सहा गावांमधील बाधित शेतकरी यावेळी उपस्थित होते. सर्व बाधितांनी पुनश्च एकदा वैयक्तिकरित्या हा मोबदला आम्हाला मान्य नसल्याचे लेखी लिहून दिले.मोबदला उचलणार नाही व कोणत्याही परिस्थितीत जमीनही देणार नाही असे लेखी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!