ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंदापूरला झालेला कार्यक्रम फलटणला करणार : दादांना देणार शरद पवार धक्का !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्या सोबत घेवून विधानसभेला सामोरे जात आहे. त्यापूर्वी आता अजित पवार गटातील नेत्याना आपल्या सोबत घेणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगू लागली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला धक्का मानला जात आहे. भाजपचा मोठा मोहरा आपल्या हाती घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील नाराज नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. आता मी फलटणला जाणार असून इंदापूरला झालेला कार्यक्रम तिथे घेणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, हर्षवर्धन मला बोलता बोलता म्हणाले की, आम्हाला काही काम द्या. पण काहीही काम करायला हर्षवर्धन कशाला हवा. कठीण काम, लोकांच्या जीवनमरणाचे काम असेल तर ते हर्षवर्धनला देऊ. तुम्हाला आता ते करावे लागेल. मला निवडणूक लढायची नाही. मला 14 वेळा निवडून दिले. मला आता स्वत:साठी काही नको. तुम्ही आता हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थितांना केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला राज्याचा चेहरा, लोकांचे जीवनमान बदलायचे आहे. ते करायचे असेल तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, प्रशासन आहे, अशा लोकांची आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आहे. त्यामुळे अशा लोकांना विधानसभेत पाठवणे हे तुमचे काम आहे. त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवण्याचे काम माझे आहे, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार गटाचे विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटात नाराज आहेत. अजित पवार यांनी आमदार दीपक चव्हाण यांना फलटणची उमेदवारी जाहीर केल्यामुळे रामराजे निंबाळकर नाराज आहेत. महायुतीमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितल होते. कार्यकर्ते जे म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले होते. त्यासाठी फलटणमध्ये लवकरच मेळावा घेणार असून कार्यकर्त्यांशी चर्चा करुन, त्यानंरत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!