ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांचा चेहरामोहरा बदलेल !

गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांची माहिती

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे. हे अभियान ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची दिशा असून प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग यात महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी पत्रकार परिषदेत केले.

या अभियानाचा मुख्य उद्देश गावोगावी सुशासन प्रस्थापित करणे, ग्रामस्थांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे हा आहे. योजना केवळ प्रशासकीय यंत्रणापुरती मर्यादित नसून ग्रामस्थांच्या थेट सहभागावर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास विभाग शाश्वत विकासासाठी ठिबक सिंचन, शेततळी, बंधारे, जलसंवर्धन, जलयुक्त शिवार, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, आवास योजनांतर्गत घरे, महिलांसाठी बचतगट, दुग्धोत्पादन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. या सर्व प्रयत्नांना अभियानातून प्रोत्साहन मिळणार असल्याचे कवीतके यांनी नमूद केले. अभियानाचे सात घटक ते म्हणजे सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, योजनांचे अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदान यांचा समावेश आहे.

यासाठी पुरस्कार योजना देखील सरकारने आखली आहे.राज्यात प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस ५ कोटी, द्वितीयस ३ कोटी, तृतीयस २ कोटी, विभागीय पातळीवर अनुक्रमे १ कोटी, ८० लाख, ६० लाख तर जिल्हा व तालुका पातळीवरही आकर्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

हा उपक्रम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार असून १०० गुणांच्या निकषांवर मूल्यांकन होईल. पारदर्शक प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, पर्यावरण, कर वसुली आणि लोकसहभाग यांचा विचार केला जाईल. गटविकास अधिकारी कवीतके यांनी पुढे बोलताना सांगितले की, हे अभियान खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे दुरदृष्टीपूर्ण पाऊल ठरणार आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन यात सहभाग घेतल्यास गावांचा चेहरामोहरा बदलून शाश्वत विकास साधता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!