शिवपुरीतील अग्नि मंदिर मानवधर्मासाठी ऊर्जा स्थान बनेल
जागतिक अग्निहोत्र दिनी भूमिपूजन सोहळा उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री क्षेत्र शिवपुरीत उभारण्यात येत असलेल्या नवीन अग्नि मंदिरामुळे संपूर्ण मानव समाजाला एक प्रकारची दिशा आणि वैश्विक ऊर्जा प्राप्त होईल.हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल आणि नक्कीच संपूर्ण मानव धर्मासाठी हे एक ऊर्जा स्थान बनेल याचा विश्वास वाटतो,असे प्रतिपादन विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले.बुधवारी,१२ मार्च जागतिक अग्निहोत्र दिनाचे औचित्य
साधून शिवपुरी (ता.अक्कलकोट) येथे संपूर्ण विश्व कल्याणासाठी उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या भव्य दिव्य अग्नि मंदिराचा भूमिपूजन सोहळा डॉ.राजीमवाले यांच्या हस्ते
सपत्नीक पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना डॉ.राजीमवाले म्हणाले की,शिवपुरीमध्ये परमसद्गुरु श्री गजानन महाराजांनी सहा मुलाधार चक्र असलेली सहा स्थाने यापूर्वीच बनवलेली आहेत. आता हे सातवे स्थान जे आहे हे शरीरातील अंतिम स्थान असणार आहे.या इमारतीमध्ये फक्त सकाळ संद्याकाळी अग्निहोत्र,नैमित्तिक हवन एवढेच केले जाणार आहे. याच्यामध्ये साधकांना ध्यानधारणा करण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ही इमारत सहस्त्र कमल म्हणजेच १ हजार पाकळ्या असलेली कमल दलाप्रमाणे हिची उभारणी करण्यात येणार आहे.यासाठी देश विदेशातून अग्निहोत्र साधकांकडून अग्निहोत्राचे भस्म गोळा करून तसेच सप्तसिंधूंचे जल तसेच जगातील प्रमुख नद्यांचे पाणी व सात खंडातील माती यावेळी या इमारतीच्या पायाभरणीत रोपीत करण्यात येणार आहे. यावेळी देश विदेशातून आलेल्या भक्तगणांना तसेच मान्यवरांना एका चित्रफिती द्वारे या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देण्यात आली.गेल्या दोन दिवसांपासून या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवपूरी येथे करण्यात आले आहे.यामध्ये अग्निष्टोम इष्टी श्रीनिवास श्रोती (नेल्लोर ) व अहिताग्नी विकास आपटे( म्हापसा) यांनी संपन्न केली.
या भूमिपूजनासाठी जगभरातून, देश-विदेशातून अग्निहोत्र साधक येथे जमा झाले होते.त्यांनी दोन दिवस श्रमसेवा, पर्यावरण संतुलन इत्यादी बाबतीत येथे श्रमकार्यसेवा केली. आज पहाटेपासूनच वेदमंत्र घोषाच्या लहरी शिवपुरीत गुंजन करीत होत्या. चारी वेदाचे ऋत्विक गनाणी आपल्या मंत्र पठणाने शिवपुरीचे वातावरण भारावून टाकले होते.मुख्य भूमिपूजन कार्यक्रमात श्रींच्या चैतन्य पादुकांचे महापूजन डॉ.राजीमवाले व डॉ. गिरीजा राजीमवाले आणि मातोश्री मालादेवी राजीमवाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ब्राह्मणवृंदानी भूमीसूक्त,पंचतत्व सूक्त व इतर अनेक वैदिक मंत्र उच्चाराने हा सोहळा संपन्न केला.यावेळी रुद्रदेव व देवयानी यांचे उपनयन संस्कार पार पडले.सूत्रसंचालन राहुल उरणकर यांनी केले.या कार्यक्रमास आमदार संजय केळकर,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सकाळ माध्यम समूहाचे अभिजित पवार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले,अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले,सोनाई दुधचे दशरथ माने, अभिजीत सिंग, राजेश्वरी सिंग,वटवृक्ष देवस्थानचे प्रथमेश इंगळे,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,पोलीस उपायुक्त दीपाली काळे,अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर,उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार,तहसीलदार विनायक मगर,पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे,माजी नगरसेवक महेश हिंडोळे,दिलीप सिद्धे,शाम मोरे, अभय खोबरे,लाला राठोड,विलास गव्हाणे,बाळासाहेब कुलकर्णी, मोहन डांगरे, नाना गायकवाड, सुधीर कुलकर्णी, अण्णा वाले, संजय अग्रवाल, पुरोहित अप्पू पुजारी,प्रा.शिवशरण अचलेर आदींची उपस्थिती होती.या सोहळ्याला देश विदेशातून अनेक अग्निहोत्र अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्त भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आली होती.
हत्तीवरून सवाद्य मिरवणूक
भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी श्री चैतन्य पादुकांची सवाद्य मिरवणूक शिवपुरी येथून काढण्यात आली.यामध्ये तासगाववरून आलेल्या हत्ती वरती श्री पादुका ठेवण्यात आल्या होत्या.या शोभायात्रामध्ये लेझीम,दांडपट्टा, काठी, हलगी व नाम घोषाचा जयजयकार होत होता. त्यामुळे नगरीतील वातावरण भक्तिमय बनले होते.