धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील सीना नदीला आलेला पूर ओसरून तब्बल एक महिना उलटला असला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पूरानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार आहे. दिवाळीसारखा सण जनरेटरच्या उजेडात साजरा करावा लागत आहे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. पूर गेल्यानंतर सरकारने तातडीची मदत म्हणून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली, तरी त्या रकमेने फक्त जनरेटर भाडे आणि डिझेलचा खर्च भागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही.
या गावातील एका शेतकऱ्याने सांगितले की, पूर गेल्यावर आम्ही वाट पाहत होतो की सरकारकडून काही मदत येईल आणि वीज पुन्हा सुरू होईल. पण अजूनही आमच्या घरात अंधार आहे. जनरेटर लावून दिवे लावावे लागत आहेत. दिवाळीत आकाशकंदील लावायचा तर तोही डिझेलवर लावावा लागत आहे. काही कुटुंबांनी शासनाच्या दिवाळी किट मधील वस्तूंनीच सण साजरा केला, तर काहींना चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी ऊस कापून खाऊ घालण्याची वेळ आली आहे. पूरानंतर शेतातील पिके वाहून गेल्याने जनावरांसाठी खाद्य मिळवणेही आव्हान ठरत आहे.
पूरग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी घोषणा केली होती. पण अजूनही अनेक गावांमध्ये ती मदत पोहोचलेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण बँकांनी ती रक्कम होल्ड केली आहे. हे सरकारच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. ओमराजे म्हणाले की, सरकारने दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे सांगितले, पण आज गावोगावी पाहा, लोक अंधारात आहेत, दिवे नाहीत, वीज नाही, सण नाही. त्यामुळे सरकारने जरा वास्तव बघावे आणि शक्य असेल तर दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या मते, पूराच्या पाण्यामुळे वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु ग्रामीण भागात उपकरणे आणि तंत्रज्ञांची कमतरता असल्याने प्रक्रिया धीमी आहे. दरम्यान, पूरग्रस्तांनी सांगितले की, आम्हाला सांगितलं जातंय की दोन दिवसात वीज येईल, पण तो दोन दिवसांचा शब्द मागच्या महिन्यापासूनच ऐकत आहोत. आता दिवाळी आली, तरी घरात अंधारच आहे.