ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सरकारची होणार दुहेरी कोंडी : मराठा आरक्षणानंतर आता आणखी एक आंदोलन उभं राहणार !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, काल रात्री मुंबईत झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तसेच पावसामुळे आझाद मैदानावर  पाण्याची डबकेदेखील तयार झाली आहेत.

डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनासोबतच आता आणखी एक आंदोलन राज्यात तापण्याची शक्यता असून यामुळे सरकारची दुहेरी कोंडी होण्याची शक्यता आहे.

प्रहारचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांची आजपासून राज्यभरात शेतकरी आणि शेतमजूर हक्क यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या यात्रेची सुरूवात वाशिम जिल्ह्यातून केली जाणार आहे. त्यानंतर रोज प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार असून ६ ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीवर बच्चू कडू ठाम आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात ते सभा घेणार आहेत.

या आंदोलनावर बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी लढलो तर मत मिळत नाहीत, शेतकरी आंदोलनात येत नाहीत, असं एका मोठ्या नेत्याने आम्हाला म्हटलं, पण शेतकऱ्यावर आमचा विश्वास आहे, शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. ही यात्रा पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जणार आहे. यामुळे आता सरकारची दुहेरी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!