ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढल्या !

अक्कलकोट तालुक्यातील रस्ते पडतायेत ओस

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मार्च महिन्याचा पहिला आठवडा आहे यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने ग्रामीण भागातील  नागरिक हैराण झाले असून उन्हामुळे त्यांची तगमग वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा त्रास विशेष:ता अबाल वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.वाढत्या उन्हामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील रस्ते दुपारच्या वेळेस ओस पडत आहेत.

हवामान विभागाच्या मते देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा दोनच दिवसांपूर्वी हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा थोडा जपूनच असे म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे.यंदाचा फेब्रुवारी महिना देखील तीव्र उन्हाळ्यासारखा जाणवला. साधारण १९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदा फेब्रुवारी महिना हा प्रथम क्रमांकावर होता. फेब्रुवारी महिन्यात देशात १५.२ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली.यापूर्वी २०१६ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच १४.९१ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती. यातच फेब्रुवारी महिन्याची सरासरी कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस देखील सर्वोच्च पातळीवर होते. यापूर्वी २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी २९.४४ सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हा मार्च महिना तर खूपच त्रासदायक ठरेल,अशी चिन्हे आहेत आणि चित्र डोळ्यासमोर दिसू लागले आहे. यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा येतील असा अंदाज हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी दिल्याने सध्या त्याची तीव्रता पण जाणवू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!