कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापुर शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी नटसम्राट केशवराव भोसले यांची 134 वी जयंती आहे. मात्र त्याच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रात्रीपासून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रन मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामध्ये हे ऐतिहासिक सभागृह पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
या घटनेवर आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. शिवाय हे नाट्यगृह पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी ते बांधले होते. हे नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे, अशा शब्दात मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.