ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजपासून रामलल्लाचा प्रतिष्ठापना विधीला आरंभ

अयोध्या : वृत्तसंस्था

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अयोध्येच्या राममंदिरातील बालरूपातील प्रभू श्रीरामचंद्र अर्थात रामलल्लांच्या भव्यदिव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवारपासून सुरू होत आहेत. २२ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होऊन रामलल्ला विराजमान होतील, अशी माहिती राममंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी दिली.

मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीनपैकी एका मूर्तीची अंतिम निवड करण्यात आली आहे. रामलल्लाच्या या मूर्तीसोबत विद्यमान मूर्तीदेखील गाभाऱ्यात असेल. चंपत राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रतिष्ठापना सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाशी संबंधित सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रतिष्ठापनेचे विधी १६ जानेवारीपासून सुरू होऊन ते २१ जानेवारीपर्यंत चालतील. यानंतर सोमवारी मुख्य विधी पार पडेल, असे राय यांनी सांगितले.

२२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या पवित्र मुहूर्तावर प्रतिष्ठापना केली जाईल. हा मुहूर्त वाराणसीचे प्रख्यात पुजारी गणेश्वर शास्त्री यांनी काढला असून प्रतिष्ठापनेशी संबंधित सर्व विधी वाराणसीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडून केले जाणार
आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!