ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नेत्याने दिला दोन्ही भावांना निर्वाणीचा इशारा : तर मराठी माणूस यांना माफ करणार नाही !

मुंबई  : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी या दोन्ही भावांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. मनसे व शिवसेनेच्या ठाकरे गटाची युती झाली नाही, तर मराठी माणूस या पक्षांच्या दोन्ही नेत्यांना माफ करणार नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे मनसेचे नेते युतीसंबंधी कमालीचे सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र हितासाठी तथा मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मकि प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही एकमेकांशी सूसंवाद साधताना दिसून आले होते. यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चेने जोर धरली असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर सातत्याने तिखट शब्दांत निशाणा साधत आहेत. यामुळे संभाव्य युतीविषयी अनिश्चितता निर्माण झाली असताना प्रकाश महाजन यांनी उपरोक्त विधान केले आहे.

प्रकाश महाजन मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, मागील काही दिवसांपासून ठाकरे गट व मनसेचे एकमेकांवर बोलणे सुरू आहे. त्यामुळे मराठी माणूस व्यथित झाला आहे. मनसे व ठाकरे गटाची युती झाली नाही, तर मराठी दोघांनाही (राज व उद्धव ठाकरे) माफ करणार नाही. त्यामुळे त्यांची एक चूक मराठी माणसाला 100 वर्षे मागे नेईल. तसेच याची नोंद इतिहासात काळ्या अक्षरांत घेतली जाईल. शत्रूलाही तेच हवे आहे. कदाचित ही युती झाली नाही तर भाजप या दोन्ही पक्षांनाही संपवू शकतो.

यापूर्वी शिवसेना व मनसेची चर्चा झाली होती, तेव्हा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर दोनवेळा मातोश्रीवर गेले होते. बाळा नांदगावकर जाणे म्हणजे स्वतः राज ठाकरे जाणे आहे. कारण, राज ठाकरे व बाळा नांदगावकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता गत काही दिवसांत एखादा व्यक्ती राज ठाकरे यांच्याकडे आला आहे का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, मराठी एक म्हण आहे. महादेव देवळात आणि पाणी घालता वेशीवर… उपयोग काय? महादेवाच्या पिंडीवर जाऊन पाणी घाला. संजय राऊत तुम्ही मोठे नेते आहात. पण युतीविषयी तुम्ही बाहेरूनच सर्वकाही बोलत आहात. मनसे – ठाकरे गटाची युती होईल किंवा नाही हा भविष्याच्या गर्भातील विषय आहे. दोन्ही बाजूकडील सर्वांनी शांत राहिले पाहिजे. योग्य त्या व्यक्तीने योग्य त्या व्यक्तीसोबत योग्य त्या पद्धतीने संवाद साधला पाहिजे, असेही प्रकाश महाजन यावेळी आपल्या व ठाकरे गटातील नेत्यांना वडिलकीचा सल्ला देत म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!