ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरची शरद पवार गटाची धुरा पुन्हा जुन्या नेत्याकडे !

सोलापूर : वृत्तसंस्था

स्थानिक निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीतील घटक पक्षाला अनेक ठिकाणी मोठे धक्के बसत असताना आता सोलापूरमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतेच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला. हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असतानाच, पवारांनी तात्काळ आपल्या एका विश्वासू हुकूमी एक्क्याला पुढे आणले आहे. सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महेश गादेकर हे 1992 सालापासून शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठपणे काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून पवारांची साथ दिली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची ही निष्ठा कायम आहे. त्यामुळे, सोलापूरमध्ये पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी एका निष्ठावान आणि जुन्या नेत्याकडे सोपवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महेश गादेकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजकारण आणि राजकारणातून झाली. त्यांच्या पक्षीय राजकारणाचा प्रवास 1992 साली सुरू झाला, जेव्हा त्यांची सोलापूर शहर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांच्या कामाची दखल घेऊन 1996 साली त्यांना सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, ज्यात सर्वात जास्त तरुण कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन त्यांनी निवडून आणले. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर ते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

त्यांच्या निष्ठा आणि कार्यामुळे पक्षाने 2010 साली त्यांच्यावर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात जास्त 17 नगरसेवक निवडून आणले. तसेच, 2014 मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. आता, अलीकडील घडामोडींनंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, जो त्यांच्यावरील पक्षाचा वाढता विश्वास दर्शवतो.

गादेकर यांच्या कामाची दखल त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही घेतली जाते. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोलापुरात पहिला भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यास राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. याशिवाय, सोलापूर शहराध्यक्ष असताना त्यांनी ‘फिरता दवाखाना’ ही अभिनव संकल्पना सलग पाच वर्षे यशस्वीपणे राबवली, ज्याद्वारे त्यांनी पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!