नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेतील घुसखोरीच्या कटाचा मुख्य सूत्रधार ललित झा याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. ललितने कटाचे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष घुसखोरी करणाऱ्या आपल्या चार साथीदारांचे मोबाईल जाळून टाकल्याचे समोर आले आहे. पोलीस या पाचही जणांना शनिवारी किंवा रविवारी संसदेत नेऊन कटाची अंमलबजावणी कशी केली हे जाणून घेण्यासाठी सीन रिक्रिएट करण्याची शक्यता आहे.
ललितने संसदेतील घुसखोरीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसेच आपल्या मित्रांनादेखील पाठवला होता. यानंतर तो दिल्लीतून पसार झाला. जाताना ललित आपल्या साथीदारांचे मोबाइल फोन घेऊन गेला. पुरावे मिटवण्यासाठी त्याने ते जाळून टाकले. तो राजस्थानच्या नागौरला पळून गेला होता; परंतु पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यानंतर तो दिल्लीत परतला आणि गुरुवारी रात्री उशिरा त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पटियाला हाऊस न्यायालयात हजर केले.
लोकसभेत घुसखोरी करणारे सागर शर्मा व मनोरंजन डी आणि संसद परिसरात गोंधळ घालणारे नीलम आझाद व अमोल शिंदे या चार जणांना गुरुवारी सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. आरोपींनी त्यांच्या बुटात स्मोक कॅन कशाप्रकारे लपवला होता, याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणातील सहावा संशयित विशाल शर्मा आणि त्याच्या पत्नीलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. विशालच्या गुरुग्राममधील घरी हे पाचही जण थांबले होते. आरोपींचे कुटुंबीय, नातलगांचीही चौकशी करण्यात येत आहे