मुंबई : वृत्तसंस्था
अजित पवारांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवशीच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 ते 35 आमदार विलीनीकरणाच्या बाजूने असल्याचा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे पक्षातील विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे.
अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर पक्षाच्या दोन्ही गटांमधील विलीनीकरणाची चर्चा थंड पडली होती. परंतु शरद पवार गटाचे नेते वारंवार या चर्चेला गती देत आहेत, तर अजित पवार गटाचे काही नेते यास विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर खोसकर यांनी आपल्या पक्षाच्या बहुतांश आमदारांचा विलीनीकरणाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी म्हटले की, “राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण 100 टक्के झाले पाहिजे. आपल्या नेत्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर विलीनीकरण झालेच पाहिजे. सुनेत्रा पवार आमच्या गॉडफादर आहेत, त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कमपणे उभे राहावे.”
शपथविधीच्या दिवशी 40 पैकी 30-35 आमदार विलीनीकरणाच्या बाजूने होते, अशी माहिती खोसकर यांनी दिली. सुनेत्रा पवारांनी मंगळवारी पक्षाची बैठक बोलावली असून, त्यात विलीनीकरणावर स्पष्ट भूमिका मांडली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. हिरामण खोसकर यांनी शरद पवार गटातील नेत्यांशी स्वतःची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. मात्र, 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरण होणार असल्याची चर्चा कानावर आली होती, असेही त्यांनी नमूद केले. खोसकर यांनी असेही म्हटले की, “दोन्ही गटांचे विलीनीकरण झाल्यास सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असाव्यात. शरद पवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा. दोन्ही पक्ष एकत्र आले तर सर्वांनाच दिलासा मिळेल.”