नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील सत्ता राखण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांनी भाजपच्या पराभवासाठी अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीला जबाबदार धरलेले असताना दुसरीकडे भाजप मात्र अजित पवार गटासोबत निवडणूक लढवण्याबद्दल ठाम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. अजित पवार रात्री 1 ते सकाळी 8 तास दिल्लीत होते. त्यांनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळच्या सुमारास दिल्लीला पोहोचले. अमित शहा आणि अजित पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल चर्चा झाली. जागावाटप लवकर करा. लोकसभा निवडणुकीप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत लटकवू नका, असे आवाहन अजित पवारांनी शहांकडे केले. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला टाळायला हवी, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी भेटीसाठी अमित शहांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या 80 ते 90 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचे अजित पवारांनी शहांना सांगितले. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. या सगळ्या जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आणखी 20 जागा अजित पवार गटाला हव्या आहेत. या जागा 2019 मध्ये काँग्रेसनं जिंकल्या होत्या.
मुंबईच्या शहरी भागात असलेल्या 4 ते 5 जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत. या जागांवर अल्पसंख्याक लोकवस्ती अधिक आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. निवडणुकी वेळी काँग्रेसचे तीन आणि अपक्ष तीन असे आणखी सहा आमदार आपल्यासोबत येतील, असा विश्वास अजित पवारांना आहे. त्यामुळे त्या जागांवर अजित पवार दावा सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत फारशी ताकद नाही.