मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर आता कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यात नवनियुक्ती जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज टिळक भवन इथे चार्ज घेतला. या प्रसंगी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधी मंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते.
काँग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव समोर आल्यानंतर अनेकांचे डोळे मोठे झाले होते. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या निवडीमुळे पक्षातील काही वरीष्ठ नेते नाराज असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या समारंभाला अनेक मोठ्या नेत्यांनी दांडी मारली.तर मला वैयक्तिक काम असल्यामुळे मी समारंभाला उपस्थित नसल्याचे काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी या आधी बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधिमंडळ पातळी वरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत.
एनएसयुआय, युवक काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी, युवक चळवळीत सक्रीय होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. त्यानंतर वऱ्हाडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसची मजबूत बांधणीत सपकाळ यांची भुमिका महत्वपूर्ण राहिली. त्यामुळे राहुल गांधी ब्रिगेडमध्ये महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती. जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष, आमदार, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव ते पक्षाचे अखिल भारतीय पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ‘गुड बुक’ मध्ये सपकाळ असल्याचे मानले जाते.