ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई मनपात सत्तासमीकरण स्पष्ट; भाजप-शिंदे गट सत्तेत, ठाकरे गट विरोधात

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मराठी महिला उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाने या निवडीवर कोणताही अपशकून न करण्याची भूमिका घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही आकड्यांचे गणित मान्य करतो आणि ते स्वीकारले आहे. सत्ता कोणाचीही असो, आम्ही सक्षम आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू.”

किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, दबाव किंवा आमिष यांना बळी न पडता ठाकरे गटातील प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात ठामपणे मांडेल. “विरोधी पक्षाची भूमिका आमच्यासाठी नवीन नाही. सत्तेत असतानाही अनेकदा विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी अधिक सजगतेने पार पाडली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, ही भूमिका केवळ एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित नसून संपूर्ण पक्षाची सामूहिक भूमिका आहे. शिस्तबद्ध आणि पद्धतशीर काम करत सभागृहात प्रभावी उपस्थिती राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याआधी रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन नावांची चर्चा होती; मात्र अंतिम निर्णय रितू तावडे यांच्या बाजूने झाला.

यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते. भाजपकडून प्रथमच महिला उमेदवार महापौरपदी देण्यात आल्याने रितू तावडे या मुंबईच्या पहिल्या महिला भाजप महापौर ठरणार आहेत.

उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांचा उपमहापौर म्हणून सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, असे जाहीर केले.

मुंबई मनपाची महापौर निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी होणार असून, भाजप-शिंदे गट सत्तेत आणि ठाकरे गट विरोधी पक्षात अशी स्पष्ट राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. मराठी महिला उमेदवार महापौरपदी देत भाजपने एक राजकीय संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!