ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सत्ता आमच्याकडे, निधीही आमच्याकडे”; नीतेश राणेंचे आक्रमक वक्तव्य

कोल्हापूर : वृत्तसंस्था

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच आहेत. त्यामुळे परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी केले. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनाच मतदान केल्यास विकासासाठी निधी मिळू शकतो. सत्तेबाहेर असलेल्यांना मतदान करून काय साध्य होणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचारसभेत नीतेश राणे बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री, पंतप्रधान, ग्रामविकास मंत्री तसेच अर्थखाते आमच्याकडे आहे. म्हणजेच निधी देण्याचा अधिकार असलेले सर्व निर्णयकर्ते भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यही भाजपचेच असले पाहिजेत. कारण तुमच्या भागाच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देण्याची क्षमता आमच्याकडे आहे.

उद्धव ठाकरे गट किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडून दिल्याने काय फायदा होणार आहे? त्यांच्या पक्षाकडे निधी देण्याचा अधिकार असलेले नेते कोण आहेत? जिथे जिथे निधीचा प्रश्न येतो, तिथे भाजपचेच नेते निर्णय घेतात, असा दावा राणे यांनी केला.

निधी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे स्पष्ट करताना नीतेश राणे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपकडे असतील तर विकासाला गती मिळेल. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ. या भागाच्या विकासाची जबाबदारी माझी असेल. सरकारमध्ये निधी वाटपाचे आणि मंजुरीचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्याशिवाय राज्यात एक रुपयाही खर्च करता येत नाही.

विरोधी पक्षांवर टीका करताना राणे म्हणाले की, उर्वरित पक्षांचे नेते फक्त मोठी मोठी भाषणे करतील. मात्र त्यांच्या हातात तुमच्या भागाच्या विकासासाठी काहीही नाही. उबाठा आणि काँग्रेस अमेरिका किंवा पाकिस्तानातून निधी आणणार आहेत का? निधी देण्याची त्यांची लायकी किंवा हिंमत आहे का? त्यांच्या उमेदवारांना प्रश्न विचारा की सत्ता नसताना तुम्हाला मतदान कशासाठी करायचे, गोट्या खेळायला का? अशा शब्दांत नीतेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!