जळगाव : वृत्तसंस्था
११ दिवसांपूर्वी ६६ हजार या ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून भाववाढ सुरू झालेल्या सोन्याच्या भावाने याच महिन्यात ६५ हजारांचा पल्ला ओलांडला होता. त्यानंतर भाववाढ कायम राहत ९ मार्च रोजी सोने ६६ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चार दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर सोन्याचे भाव कमी होत जाऊन ६५ हजार ६०० रुपयांवर आले होते. त्यानंतर मात्र मंगळवार, १९ मार्च रोजी त्यात पुन्हा ४०० रुपयांची वाढ होऊन ते ६६ हजार रुपये प्रतितोळा झाले. बुधवार, २० मार्च रोजी १०० रुपयांची वाढ झाली. ही किरकोळ वाढ असली तरी सोने ६६ हजारांच्या पुढे गेले आहे.
चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे. ९ मार्च रोजी सोने ६६ हजारांवर पोहोचले असताना त्या दिवशी चांदी ७४ हजारांवर स्थिर होती. १५ मार्च रोजी ती ७६ हजारांवर पोहोचली. यानंतर पुन्हा भाव कमी होत जाऊन १९ मार्च रोजी चांदी ७५ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. बुधवार, २० मार्च रोजी पुन्हा ३०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर आली.