ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विजेच्या लपंडावामुळे सोलापुरावासिय झाले हैराण

सोलापूर : प्रतिनिधी

सध्या कडक उन्हाच्या झळा सोलापुरावासियांना बसत असतानाच भर दुपारी महावितरणच्या वतीने बुधवारचा दिवस साधून विविध भागांमध्ये विजेची कामे हाती घेण्यात आली. कडक उन्हामुळे तडफड सुरू असतानाच महावितरणकडून शहरात अनेक भागांमध्ये बत्ती गुल आणि काही भागांमध्ये विजेच्या लपंडावामुळे दिवसभर शहरवासीय हैराण झाले होते. भर दुपारी महावितरणकडून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने अनेकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

सध्या सूर्य आग ओकत असल्याने परिसरासह सोलापूर शहरातील तापमान ४२ अंशाच्या पुढे जात आहे. एकीकडे शासन आणि जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर उन्हात न येता घरी आणि कार्यालयातच राहावे, तर व्यापारी विक्रेत्यांनी थंड ठिकाणीच राहावे, असे आवाहन करण्यात येत असताना दुसरीकडे भर दुपारी बाहेर न निघण्यासाठीच्या प्रयत्नातील अनेकांना वीज पुरवठा खंडित आणि विजेच्या सततच्या लपंडावामुळे अक्षरशः घामेघुम होऊन हैराण व्हावे लागले. मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणच्या तारा तुटून पडल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम महावितरणने थंड वेळेला न घेता भर दुपारी हाती घेतल्याने याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. अनेकांनी महावितरणच्या या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!