मुंबई : उद्द्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सत्तधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पहायला मीळाली. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक चकमकीमुळे गोंधळ उडाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे, दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा करताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘गृहमंत्रीच सचिन वाझे यांना पाठिशी घालत आहेत’, असा आरोप केला.
मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधक-सत्ताधारी वेलमध्ये आमने-सामने दिसले. वेलमध्ये उतरत दोन्ही बाजूच्या आमदारांनी समोरासमोर येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आधी दहा मिनिटे आणि नंतर अर्धा तास विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी निवेदन सादर केले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वाझे यांचा राजीनामा नाही. वाझे हे कोणत्या पक्षाचे आहेत? वाझेला निलंबित करा. कारवाई नाही म्हणजे वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे आहे. वाझे यांनी निलंबित करा. हा खरा चेहरा दिसतोय”, असा आरोप फडणवीसांनी केला.
विरोधी पक्षनेत्यांकडे सीडीआर कुठून आला. हा सीडीआर मिळविण्याचा अधिकार त्यांना आहे का याची विचारणा केली पाहिजे असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. नाना पटोलेंनी फडणवीसांवर थेट आरोप केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सीडीआर मी मिळविला, माझी चौकशी करा, असे आव्हान पटोलेंना दिले. सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही आम्हाला धमकी देता काय? अशा प्रकारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख आणि नाना पटोले यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
“मूळात या प्रकरणात कोणतीही याचिक दाखल केली नाही. त्यामुळे न्यायप्रविष्ट नाही. यांना अभिमान वाटतो की, लोक इथे येऊन आत्महत्या करतात. पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं? इतके पुरावे देऊन ही कारवाई होत नसेल, मग आम्हाला तुमच्यावर संशय आहे”, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. याच मुद्द्यावरून विधिमंडळात “आताच्या आता वाझे यांना निलंबित करा आणि अटक करा”, अशी मागणी करत भाजपचे आमदार जागेवरून उठले आणि गृहमंत्री हाय हायच्या घोषणा दिल्या.