मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली असून दुसरीकडे सर्वच पक्ष उमेदवारीची घोषणा करीत असतांना अनेक नेते दादांना सोडून शरद पवारांकडे जात असल्याचे चित्र असतांना यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले कि, माझ्या पक्षातून जे लोक शरद पवारांकडे चालले आहेत ते तिकीट मिळणार नाही म्हणून चालले आहेत. मी ज्यांना तिकीट देणार नाही असे सांगितले, तेच लोक पक्ष सोडत आहेत. ज्यांना तिकिटे मिळणार आहेत ते सर्वजण आपल्या सोबतच आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले, विरोधक सातत्याने फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्त राधाऱ्यांनी तिजोरी मोकळी केल्याचा आरोप केला जात आहे. पण, निवडणुका जवळ आल्या की दोनचार मंत्रिमंडळ बैठका जास्त होतात. हे काही नवीन नाही. आम्ही शेवटच्या अर्थसंकल्पात विचारपूर्वक योजना दिल्या आहेत. लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली त्यामुळे विरोधकांनी आधी पैसेच खात्यात येणार नाहीत, अशी आवई उठवली. नंतर पैसे आले तर सरकार काढून घेईल म्हणाले. त्यामुळे विरोधकांना तारतम्य राहिलेले नाही. लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यामुळे ते गडबडून गेले आहेत. अडीच कोटी महिलांच्या खात्यात आम्ही पैसे टाकले. आता फक्त निवडणूक होईपर्यंत ही योजना चालणार असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. पण ही योजना तात्प- रती नाही. निवडणुका होतील जातील पण ही योजना कायम राहील. भविष्यात या योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविण्याची योजना ही तत्कालीन सुशीलकुमार शिंदे यांच्या योजनेसारखी नाही. ही योजना देखील कायम सुरूच राहील. आम्ही आमच्या कामाच्या जोरावर मते मागू आणि जनता आम्हाला पुन्हा संधी देईल, असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला.