मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे सरकारने अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला. मात्र या अंतर्गत वाटण्यात आलेल्या साड्या फाटक्या निघाल्या आहेत. फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला? असा खडा सवाल राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. त्यांनी यासंदभात ट्विट केले असून व्हिडिओही शेअर केला आहे.
दरम्यान, ”रांगेत उभे राहून या महिला साडी घेतात. सारा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते’, असे दुकानदार त्यांना सांगतात. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेकानेक तालुक्यांत या घटना समोर आल्या”, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, ”दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किट वाटपाच्या नावाखाली रांगेत लावले. नंतर सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला संतापल्या आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाला होता”, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.