सोलापूर प्रतिनिधी : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापुरात घडलेली मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला हादरवणारी ठरली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने निवडणूक प्रक्रियेत राजकारण किती हिंसक आणि अमानवी होत चालले आहे, याचे भयावह चित्र समोर आले आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या दबावातूनच हा खून झाल्याचा आरोप होत असून, या घटनेनंतर सोलापुरातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मनसेसह विविध स्तरांतून स्थानिक भाजप नेत्यांवरही जोरदार टीकेची झोड उठली आहे.
या घटनेनंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी तातडीने सोलापूर गाठून बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घरातील वातावरण, कुटुंबीयांची अवस्था आणि विशेषतः बाळासाहेबांच्या दोन लहान मुलींचा आक्रोश पाहून अमित ठाकरे भावूक झाले. ही घटना केवळ एका कार्यकर्त्याची हत्या नसून, एका संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर आणि भावनिक पत्र लिहून तीन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. पत्रात त्यांनी सोलापुरात घडलेली घटना अविश्वसनीय आणि असह्य असल्याचे नमूद करत, राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल, याची कल्पनाही करता आली नसल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब सरवदे यांची ज्या क्रूर आणि निर्दय पद्धतीने हत्या करण्यात आली, ती आजही मन सुन्न करणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जे दृश्य पाहिले आणि जे ऐकले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची तातडीने प्रत्यक्ष भेट घेण्याची गरज वाटल्याचेही अमित ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट होऊ शकली नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
पत्रात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची स्थिती विशेषतः अधोरेखित करण्यात आली आहे. त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा आक्रोश ऐकून मन स्तब्ध झाल्याचे सांगत, त्या मुलींना अजूनही त्यांच्या वडिलांचे कायमचे जाणे समजलेले नाही, हे वास्तव असह्य असल्याचे अमित ठाकरे यांनी लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या लहानग्या मुलींनी आपल्या हातांनी वडिलांचे अस्थी-विसर्जन केल्याचा प्रसंग वर्णन करताना ते भावूक झाले. पत्नी आणि आईसमोर उभे राहिल्यावर काय बोलावे, हेच सुचले नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या पत्रातून अमित ठाकरे यांनी केवळ संवेदना व्यक्त केल्या नाहीत, तर ठाम शब्दांत सरकारकडे जबाबदारीची मागणीही केली आहे. निवडणुका येत राहतील, पण सत्तेसाठी कोणाचे घर उद्ध्वस्त होणे ही कोणती संस्कृती आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पहिली आणि महत्त्वाची मागणी म्हणून त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची, विशेषतः त्यांच्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण भविष्याची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देणे ही राज्यप्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असल्याचे अमित ठाकरे यांनी ठामपणे अधोरेखित केले आहे.