चार महिन्यापूर्वी चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पाणी टँकर सापडला
अनेक ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागात ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीचे प्रमाण वाढले होते. हे प्रकरण आता पोलिसांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.यात एका प्रकरणात चार महिन्यापूर्वी चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली असून त्यांच्यामार्फत अन्य घटनेतील चोरीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
या रॅकेट मधील आरोपी व त्याचा इतर साथीदारसह अजून ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.२४ मे २०२४ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील प्रसिद्ध अशा हॉटेल फॉर पेटल समोरून एजाज मुतवल्ली यांचा ट्रॅक्टर व पाणी टँकर चोरीस गेला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज ही काही प्रमाणात पोलिसांना हाती लागले होते. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी तपासाची चक्र फिरवली.तब्बल चार महिने या चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू होता.
या प्रकरणात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गु.र.नं. २२३/२०२४, भादविसं कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यात महादेव वैजीनाथ गाडेकर, वय – ३७ वर्षे, (रा. वैराग नाका, सोलापूर रोड, बार्शी) , हरीश वासुदेव चव्हाण, वय -१८ वर्षे ४ महिने,(रा.आगरखेड तांडा,ता.इंडी, जि.विजापुर, कर्नाटक) यांना सदर गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडुन तपासात महिंद्रा ५७५ ट्रॅक्टर व पाणी टँकर जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी तपास केला.त्यांना पोलीस हवालदार संजय ठेंगळे, धोंडीबा ठेंगळे, विकास पवार, चिदानंद उपाध्ये यांनी सहकार्य केले.