मुंबई वृत्तसंस्था : राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी या निवडणुका होणार आहेत. यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होईल. उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून, त्याच दिवशी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह जाहीर केली जाणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे मत पंचायत समितीसाठी असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून, महापालिका निवडणुकांप्रमाणेच प्रक्रिया राबवली जाईल. राखीव जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असून, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निवडणुकांसाठी राज्यभरात एकूण २५ हजार ४८२ मतदान केंद्र असतील. ही निवडणूक ईव्हीएमच्या माध्यमातून होणार असून, २२ हजार कंट्रोल युनिट आणि १ लाख १० हजार बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा असणार आहे. तसेच महिला मतदारांसाठी काही ‘पिंक मतदान केंद्रे’ आणि आदर्श मतदान केंद्रेही उभारण्यात येणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता ग्रामीण भागातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येणार आहे.