ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“एलपीजी गॅस टंचाईची वास्तवता उघड : सुप्रिया सुळे सरकारवर थेट प्रश्न”

मुंबई : वृत्तसंस्था

पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांचा ठसा भारतावरही उमटत असल्याचे दिसत आहे. याचा थेट परिणाम घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर होत असून नागरिकांना अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत.

याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या की, बारामती आणि शिरूर परिसरात गॅसचा तुटवडा स्पष्टपणे जाणवत असून, वास्तविक परिस्थिती सरकारद्वारे लपवली जात आहे. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, “तुटवडा नाही” असे का सांगितले जाते, जेव्हा नागरिक प्रत्यक्ष अडचणीत आहेत?

सुळे म्हणाल्या की, एलपीजी वितरणाची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्यासारखी आहे आणि यावर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. “आपण सरकारवर आरोप करण्यासाठी नव्हे, तर वास्तव मांडण्यासाठी बोलत आहोत. सामान्य नागरिक आणि गृहिणी मोठ्या अडचणीत आहेत. सरकारने पुढे येऊन सत्य स्वीकारावे आणि योग्य उपाययोजना कराव्यात,” असे त्यांनी नमूद केले.

त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही विनंती केली की, राज्यातील विविध भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा. बारामतीसह पुणे, नाशिक, बीड, जळगाव आणि नागपूर या भागांमध्ये व्यवसायांवरही गॅस टंचाईचा परिणाम होत आहे. काही औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे ७५% कामगार कमी केले गेले आहेत, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

सुळे म्हणाल्या की, लग्नसमारंभासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही गॅस टंचाईचा परिणाम होत असून, सरकार सांगत असलेले चित्र आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठा फरक आहे. “बारामतीकरांना गॅसचा पुरवठा सुरळीत झाला, तर आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानू,” असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण परिस्थिती राजकीय नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीशी संबंधित असल्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवून तोडगा काढावा आणि विधानसभेत अधिकृत निवेदन करावे, अशी मागणी सुळे यांनी केली.

दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना सुळे यांनी स्पष्ट केले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाविकास आघाडीनेही बारामतीसाठी उमेदवार देण्याची योजना नाही.

दरम्यान, बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाला अजित पवार यांचे नाव देण्यात आल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, धनगर समाजामध्ये दोन गट निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काही समर्थक पोटनिवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!