ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुतीच्या दोन्ही नेत्यांची झाली भेट अन महापालिकेची रणनीती ठरली !

नागपूर : वृत्तसंस्था 

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघड वाजण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरू केली असून, आता खऱ्या अर्थाने त्याला वेग आला आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, डोंबिवली येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर एकमेंकाशीशेजारी आसनस्थ झाले होते. त्यामुळे निर्माण झालेले वितुष्ट निवळ्याची चर्चा होती. अशातच नागपुरात दोन्ही नेत्यांमध्ये एक महत्वाची बैठक काल रात्री पार पडली असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली आहे. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

रात्री बैठक संपल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली असून, २९ महापालिका आहेत, त्या त्याठिकाणी असलेली परिस्थिती रोज बदलत जाते. पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांची जी समिती बनवली आहेत ते जागावाटपाबाबत निर्णय प्रक्रियेची सुरुवात करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. त्यात जनतेच्या हित याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील विकोपाला गेलेला वाद निवळला आहे. दोन्ही पक्षांनी सन्मवय साधून महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवल्याचे यामधून स्पष्ट दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!