मुंबई : प्रतिनिधी
भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधींचा नाही तर तो हिंदुस्थानचा आवाज आहे. देशातील जनतेची मते विचारात घेऊनच ही गॅरंटी दिलेली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले.
रविवारी मुंबईत आयोजित न्याय संकल्प सभेत राहुल गांधी बोलत होते. त्यापूर्वी गांधी यांनी सकाळी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत महासचिव प्रियंका गांधी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या पदयात्रेनंतर न्याय संकल्प सभा पार पडली. या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्षाने जनतेला विचारून, सर्व घटकांची मते विचारात घेऊन या गॅरंटी दिल्या आहेत. भाजपत केंद्रीकृत पद्धत आहे. सर्व काही नरेंद्र मोदी सांगतात तसेच चालते. आज देशात गरीब, शेतकरी, दलित, महिला, तरुण या घटकांवर अन्याय होत आहे. देशातील केवळ दोन-तीन टक्के लोकांना न्याय मिळतो. त्यांच्यासाठी न्यायपालिका काम करतात, सरकार काम करते. सर्व संस्थांमध्ये त्यांना स्थान आहे, पण ९० टक्के लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघाला तेव्हा कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी बनेल, त्याची सवय बिघडेल, असे सांगण्यात आले. मग देशातील २०-२२ धनदांडग्या लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले गेले, तेव्हा त्यांची सवय बदलली नाही का? असा सवाल करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकार हे गरीब, आदिवासी, मागास, वंचित, शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करून देशातील २०-२२ धनदांडग्यांची घरे भरत असल्याचा आरोप केला.