सामाजिक जाणिवेतून डॉ.भोई यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ; अक्कलकोट येथे भोई समाज बांधवांच्यावतीने सत्कार
अक्कलकोट : पुण्यासारख्या शहरातुन सामाजिक जाणीव व बांधिलकीतून डॉ. मिलिंद भोई यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त केलेले कार्य हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी काढले. भोई समाज बांधव व दिलीप सिद्धे मित्र परिवार अक्कलकोट यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. भोई यांचा नागरी सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भीमाशंकर बिराजदार हे होते.
डॉ.भोई यांनी १९९४ पासून पुणे शहरात शंकरराव भोई यांच्या नावाने भोई फाउंडेशनची स्थापन करून राज्यात अनाथ मुले त्यांचे संगोपन, माळीन दुर्घटनेत केलेली मदत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी केलेले काम, जनजागृतीपर व्याख्याने अशी विविध प्रकारची कामे त्यांनी केली आहेत.
देशात ज्या बारा हजार सामाजिक संस्थांचे नामांकन झाले त्यात केवळ सहा संस्थांना केंद्र सरकारने उत्कृष्ट कार्य म्हणून गौरव केला त्यात भोई फाउंडेशन होते तसेच माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्व हे अतुलनीय अद्वितीय असे आहे असेही ते म्हणाले.
डॉ.बिराजदार म्हणाले की, उपदेश देणे सोपे आहे पण लोकांची मानसिकत बदलणे खूप अवघड आहे. आजच्या काळात डॉ. भोई यांच्या सारखा माणूस होणे दुर्मिळ आहे अशा व्यक्तींचा सत्कार अक्कलकोटमध्ये होतो आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. अशा व्यक्तींचा सहवास आणि प्रेरणा मिळणे आपल्या सर्वांसाठी चांगला योग आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी केले. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत सत्कार आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी सुरेश सूर्यवंशी, प्रा.प्रकाश सुरवसे, सुनंदा राजेगावकर, मीराताई बुद्रुक, डॉ.गिरीश साळुंखे, डॉ. प्रदीप घिवारे, दिलीप कांबळे, किशोर पुदाले, अरुण भुजंगे, राजू लांडगे, शंकर व्हनमाने, लक्ष्मण लांडगे, विक्रांत पिसे, माणिक बिराजदार, अंजना सिद्धे, स्वामींनाथ चौगुले यांच्यासह भोई समाज बांधव व अक्कलकोट शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार विसरणार नाही
केवळ आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये ठेवून वंचित, दीनदलित, गरीब व दुर्बल घटकांसाठी भोई फाउंडेशनच्यावतीने काम सुरू केले त्याचे इतके मोठे रूपांतर होईल, असे मला वाटले नाही. त्यात अक्कलकोटवासीयांनी केलेला सत्कार मी कधीही आयुष्यात विसरणार नाही – डॉ. मिलिंद भोई, पुणे