सांगली : वृत्तसंस्था
सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी यांच्या कार्यकर्त्यांनी आता रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताने पत्र लिहीत ते पत्र विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावण्यात आले आहे. विशाल पाटील यांच्यासाठी असे पत्र लिहिणारे धनगर समाजातील कार्यकर्ते असून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आपण विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षणाबाबत खोटे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे. रक्ताने लिहिलेल्या त्यांचे हे पत्र विशाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करत धनगर बांधवांचा विशाल पाटील यांनाच पाठिंबा असल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये महाआघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ही जागा सोडण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे.मात्र, त्यानंतरही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि काँग्रेसचे सांगली मधील ज्येष्ठ नेते विश्वजीत कदम हे दोघेही हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी आग्रही आहेत. जागावाटप जाहीर झाल्यानंतर देखील विशाल पाटील यांनी अद्याप आशा सोडलेली नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निर्णयाबाबत पुन्हा विचार करावा, असा आग्रह या दोन्ही नेत्यांनी धरला आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघांमधील तिढा अजूनही कायम आहे.