ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ देशात जगातील सहाव्या क्रमांकाचा भीषण भूकंप ; त्सुनामीचा कहर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात बुधवारी पहाटे भूकंपाची प्रचंड धडक बसली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, हा भूकंप जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप ठरला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 4:54 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 19.3 किलोमीटर खोल जमिनीत असल्याचेही USGS ने स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर कामचटकामध्ये 4 मीटर उंचीची त्सुनामी आली असून, अनेक इमारतींना नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने शाळा आणि बालवाड्यांचे नुकसान झाल्याची पुष्टी केली आहे. राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी या भूकंपाला “दशकांतील सर्वात तीव्र” भूकंप म्हटले आहे.

जपानच्या NHK वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, त्सुनामीमुळे जपानच्या पूर्व किनारपट्टीला धोका निर्माण झाल्याने 20 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच फुकुशिमा अणुभट्टीतील कर्मचारी व नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. USGS च्या माहितीनुसार, इतकी तीव्रता असलेले फक्त दोनच भूकंप यापूर्वी नोंदवले गेले होते – एक 2010 मध्ये चिलीमध्ये आणि दुसरा 1906 मध्ये इक्वेडोरमध्ये. या भूकंपांमुळे प्रचंड मानवी व मालमत्तेचे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे, रशियातील कामचटका येथे 1952 मध्येही जगातील पहिल्या 9 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती, ज्यामुळे हवाईमध्येही त्सुनामी आली होती आणि कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!