ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर ते सिद्ध होईल; अजित पवारांच्या अपघातावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांच्या अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “हा घातपात असेल तर तो सिद्ध होईल आणि सिद्ध झाल्यास दोषींना शिक्षा मिळेल. तसेच अपघातासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांचे निराकरणही व्हायला हवे,” असे ते म्हणाले.

अजित पवारांच्या अपघातावर आमदार रोहित पवार यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. याबाबत विचारले असता पाटेकर म्हणाले, “रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले. त्या भावनेचा आदर केला पाहिजे.”

नाना पाटेकर पुढे म्हणाले, “अजित पवार माझ्या लहान भावासारखे होते. आमची मैत्री त्यांच्या तरुण वयापासून होती. कार्यकर्ता म्हणून काम करत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय प्रवास केला, तो कमालीचा होता. राजकारण बाजूला ठेवले तरी मी त्यांना नेहमी मिस करेन.”

सुनेत्रा पवार यांच्या दुःखाबाबत बोलताना ते म्हणाले, “त्यांचे दुःख इतरांपेक्षा वेगळे आहे. ते त्यांनाच सहन करावे लागेल. मात्र त्यांनी स्वीकारलेल्या पदाची जबाबदारीही पार पाडावी लागेल. वेळ लागेल, पण त्या ती जबाबदारी सांभाळतील.” दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. “तो त्यांचा निर्णय आहे. मला निर्णय घेता आला असता तर सांगितले असते; पण ते माझ्या हातात नाही,” असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असताना नाना पाटेकर यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे परिमाण मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!