पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीमधील अजित पवार गट विविध कारणानिमित्त जोरदार चर्चेत येत असतांना नुकतेच आता अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
जिथं पिकतं तिथं विकत नाही. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली. बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलून दाखवली.
दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्याचा ते बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत असा अर्थ लावला जात आहे. असे बोलून अजित पवार भावनिक राजकारण करत आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. अजित पवार म्हणाले, एकदा बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. मग त्या वेळी माझी १९९१ ते २०२४ पर्यंतच्या कामाची तुलना करा. त्या वेळी १९९१ पासूनची माझी कामे तुम्हाला कळतील. मीही आता ६५ वर्षांचा झालो. बारामतीत मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला.
बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल. मी केलेली कामे तुम्हाला कळतील. आम्ही सकाळी लवकर उठतो त्यावर आमची काहीजण चेष्टा करतात. त्यात माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही. मुस्लिम समाजाने मला काही निवेदन दिले तर काही जण वेगळे वक्तव्य करतात. मी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. बारामतीत काम करत असताना एका समाजाने सांगावं की आमच्यावर अन्याय झाला. कार्यकर्ता कसा सक्षम होईल आपण बघितले पाहिजे.