मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी न लावल्यास ४ जूनला पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच ६ जूनपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेच्या अनुषंगाने सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आगामी विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.
रविवारी, जरांगे-पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. जरांगे-पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने देशातील गोरगरिबांना न्याय दिला आहे. आज ही गोरगरीब जनता संविधानाच्या आशेवर आहे. त्यामुळे जर कोणी संविधान बदलण्याचा विचार करत असेल तर ते सोपे नाही.