ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर सत्याचा विजय होईल ; आदित्य ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील लोकशाहीच्या मूल्यांचे खच्चीकरण सुरू आहे. राज्यातील जनतेला यंदाचे वर्ष देशासाठी समर्पित करावे लागणार आहे. तुमचे मत मौल्यवान असून या मतावर आपले भविष्य अवलंबून आहे. सर्वजण सोबत लढलो तर सत्याचा विजय होईल, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेला खुले पत्र लिहिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न या पत्रातून उपस्थित केले आहेत.

देशातील लोकशाही मूल्य, संविधानाच्या कायदेशीर बाबींचे खच्चीकरण सुरू आहे. महाराष्ट्रात २०२२ मध्ये शिवसेनेतील फुटीर गटाला सोबत घेऊन प्रगतशील महाराष्ट्राचे रूपांतर ‘बिल्डर्स-कंत्राटदार’ मिळून चालवत असलेल्या एका राजवटीत केले. विकासाच्या अनेक योजनांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. फुटीरांच्या राजवटीत मुलांची आणि तुमची प्रगती होईल का, असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना मदत दिली जात नाही. हा सर्व प्रकार भयानक असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

एका आमदाराचा मुलगा व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला; परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेऱ्यात पकडला गेला आणि त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे समोर आले. त्यालाच सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. हे हिंदुत्व आपण स्वीकारणार का? असा प्रश्न ठाकरे यांनी जनतेला विचारला आहे. देशभरातून उदनिर्वाहासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांच्या स्वप्नाचा चक्काचूर केला जात आहे. प्रदूषण, गलथान कारभारामुळे राज्यातून विविध पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारी रुग्णालये व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भीषण अवस्था असल्याने अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!